मुंडन आंदोलनाचा इम्पॅक्ट ; रस्त्याचे डागडुजीचे काम अखेर सुरू
राजगुरुनगर ( खरपुडी बुद्रुक ): १८/०८/२०२६
( मुख्य संपादक डॉ. निरंजन खंडागळे )
राजगुरुनगर ते निमगाव येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण अवताडे यांनी अनोख्या पद्धतीने मुंडन आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्यानंतर संबंधित रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात झाली आहे.


सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण अवताडे यांच्या आंदोलनाला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या काही काळापासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार मागणी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने लक्ष्मण अवताडे यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मुंडन आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले आणि त्यानंतर रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले.
या आंदोलनाला खेड तालुक्यातील विविध भागांतून नागरिकांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने जनतेच्या मूलभूत प्रश्नासाठी प्रशासनाला जागे करण्याचे काम केले, ही बाब निश्चितच प्रेरणादायी मानली जात आहे.
“लोकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला, तर प्रशासनाला निश्चितच जागे करता येते,” हे लक्ष्मण अवताडे यांच्या आंदोलनातून अधोरेखित झाले आहे. समाजातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निःस्वार्थपणे पुढे येणारे अधिकाधिक सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले, तर रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
रस्त्याचे डागडुजीचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, लक्ष्मण अवताडे यांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने घेतलेल्या तातडीच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. आंदोलनाचा उद्देश केवळ प्रशासनावर टीका करणे नसून जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हा असतो, याचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरले आहे.
