शिरूर (पुणे) | १८/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री. कैलास केदारी
लाटेआळी परिसरात साडेसहा वाजता थरार; अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू
शुक्रवारची सकाळ उजाडत असतानाच शिरूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लाटेआळी येथील आंबेडकर नगर परिसरात सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहाटेच्या शांत वातावरणात अचानक गोळ्यांचा आवाज झाल्याने आंबेडकर नगर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.
या तरुणावर नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून गोळीबार केला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे का, की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
भरवस्तीत आणि सकाळच्या वेळेत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांचा शोध घेणे तसेच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
घटनेबाबत पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता असून, मृत तरुणाची ओळख आणि घटनेचे नेमके स्वरूप याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.