Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

चाकण-म्हाळुंगे वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गणेश बोत्रे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चाकण, दि. २१ ऑगस्ट २०२६ : ( मुख्य संपादक डॉ. निरंजन खंडागळे ) ( सह संपादक : श्री कैलास केदारी )

चाकण-म्हाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी आंदोलन तसेच उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीता अजितदादा पवार तसेच खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी गणेश बोत्रे यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत गणेश बोत्रे यांनी आज आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले.

मात्र, हे आंदोलन कायमस्वरूपी मागे घेतले नसून केवळ तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, असे गणेश बोत्रे यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाकडून चाकण-म्हाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत समस्यांवर ठोस व तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर येत्या काळात अधिक तीव्र आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चाकण एमआयडीसी परिसर हा राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असून दररोज हजारो कामगार, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक या परिसरातून ये-जा करतात. मात्र, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे नागरिकांना तसेच कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे आतापर्यंत अनेक नागरिक व कामगारांना आपला जीव गमवावा लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडीमुळे कामगारांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असून, उद्योगांना देखील त्याचा फटका बसत आहे. रस्त्यांची अपुरी क्षमता आणि कायमची वाहतूक कोंडी यामुळे चाकण एमआयडीसी परिसरातील काही कंपन्या स्थलांतराचा विचार करत असल्याचेही समोर येत आहे. यामुळे या परिसरातील रोजगार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

चाकण-म्हाळुंगे वाहतूक कोंडी व रस्त्यांच्या प्रश्नावर यापूर्वीही अनेक वेळा आंदोलने, मोर्चे आणि निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसून ‘परिस्थिती जैसे थे’ असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता चाकण-म्हाळुंगे परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची कामे, खड्डे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी गणेश बोत्रे यांनी केली आहे.

“आज उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे; मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास हे आंदोलन पुन्हा अधिक तीव्र स्वरूपात उभारले जाईल. चाकण-म्हाळुंगे परिसरातील नागरिक, कामगार आणि उद्योगांच्या हितासाठी हा लढा सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा गणेश बोत्रे यांनी दिला आहे.

— गणेश बोत्रे

जिल्हा परिषद सदस्य, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!