Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

डंपर चालकाच्या डोक्यात टॉमी घालणाऱ्या गुंडांना बिदर व लातूरमधून अवघ्या १२ तासांत बेड्या

चाकणमध्ये दादागिरी कराल तर पाताळातूनही शोधून काढू; गुन्हेगारांना गाशा गुंडाळा किंवा सरळ व्हा – पोलिस प्रशासनाचा सज्जड दम

चाकण : १७/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक श्री कैलास केदारी 

औद्योगिक नगरी आणि वाहतुकीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या तसेच सामान्य नागरिकांवर दादागिरी गाजवणाऱ्या गुन्हेगारांना चाकण दक्षिण पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. किरकोळ कारणावरून डंपर चालकाच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन सराईत गुंडांना चाकण दक्षिण पोलिसांच्या डिटेक्शन ब्रँचने (DB) अवघ्या १२ तासांत कर्नाटक व लातूरच्या सीमेवरून बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता नाणेकरवाडी येथील स्क्रॅप गोदामाजवळ डंपर चालक महादेव शंकर सोलंके (वय ३६) हे आपले वाहन घेऊन जात असताना रस्त्यात डंपरचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून आरोपींनी चालकाला अडवून लोखंडी टॉमीने डोक्यात जबर मारहाण केली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला.

याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), १२६(२), ३५२, ३५१(२), ३(४) नुसार खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून चाकण दक्षिण पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र, गुन्हे प्रकटीकरण शाखेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या काही तासांत घटनास्थळ परिसरातील २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून काढले. तांत्रिक विश्लेषण तसेच मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने आरोपी कर्नाटकच्या दिशेने पळाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी विशेष पथकाने क्षणाचाही विलंब न करता पाठलाग सुरू केला. एक आरोपी हरिदास रामकिशन कलबोले याला थेट कर्नाटक राज्यातील बिदर येथून, तर दुसरा आरोपी लातूर येथून ताब्यात घेण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात चाकण दक्षिण पोलिसांना यश आले.

या कारवाईमुळे चाकण परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून, कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

ही कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, मा. शशिकांत महावरकर सह-पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, मा. बसवराज तेली अपर पोलीस आयुक्त व मा. योगेश राजपुरकर सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संजय साळुंके वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण दक्षिण पोलीस ठाणे, तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!