Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

चाकणमध्ये तब्बल ₹१.१३ कोटींचा गुटखा जप्त!

सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर ट्रक ताब्यात; पाच जणांविरुद्ध गुन्हा

चाकण : १९/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री. कैलास केदारी

चाकण परिसरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. सुमारे सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवून तपासणी केली असता पानमसाला, सुगंधित तंबाखू व गुटख्यासह तब्बल ₹१ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीवरून कारवाई

अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली.

मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाण्याच्या दिशेने जाणारा ट्रक मार्ग बदलून संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने येत असल्याचे प्रशासनाच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर संभाव्य मार्गांवर पथके तैनात करण्यात आली.

राजगुरूनगर टोलनाक्यावरून पाठलाग

राजगुरूनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक आडवा लावून तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक न थांबवता पुढे नेला. त्यानंतर सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखेर चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडविण्यात आला. रात्री सुमारे ८ वाजता वाहन ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात आली.

असा आहे जप्त मुद्देमाल

प्रतिबंधित पदार्थ , वाहन , किंमत

रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला – ₹२९,९५,२००

तुळशी रॉयल जाफरानी जर्दा – ₹९,६०,०००

तानसेन सुगंधित पानमसाला – ₹२४,९४,८००

टी.ओ. प्रिमियम जर्दा – ₹२,६४,६००

आर.एम.डी. पानमसाला – ₹२६,४०,०००

ट्रक क्र. MH 18 BZ 2350 – ₹२०,००,०००

एकूण| – ₹१,१३,५४,६००

पाच जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे यांनी चाकण उत्तर पोलिस स्टेशन, पिंपरी-चिंचवड येथे संबंधितांविरुद्ध BNS 123, 223, 274, 275, 3(5) तसेच Food Safety and Standards Act, 2006 मधील विविध कलमांनुसार फिर्याद नोंदविली आहे.

फिर्यादीतील संबंधितांची नावे :

नफीस मेहबूब खान (वय ४०, हरियाणा) – वाहनचालक

निलेश राठी (खामगाव, जि. बुलढाणा) – मालक/पुरवठादार

अरुण पाटील (जळगाव) – मालक/पुरवठादार

मे. J.M.D. Enterprises (धुळे) – वाहन मालक

संजय माटा (इंदूर, मध्य प्रदेश) – वाहतूकदार.

MCOCA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव

अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणातील संबंधितांची पुरवठा साखळी, पूर्वगुन्हे आणि आर्थिक व्यवहार तपासून, दोषी आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA), १९९९ अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

प्रशासनाचा इशारा

प्रतिबंधित व आरोग्यास घातक अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५

Food & Drug Grievance Portal : complaints.mahafda.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!