मृत व्यक्तीच्या नावावर बनावट रेशनकार्ड; धान्याचा अपहार केल्याचा संशय
रेशन दुकानातील व्यवहारांचे सखोल ऑडिट करण्याची मागणी; दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
विऱ्हाम (खेड) : २७/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
विऱ्हाम : मृत व्यक्तीच्या नावावर बनावट रेशनकार्ड तयार करून शासनाकडून मिळणाऱ्या धान्याचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ सुरेश सखाराम सावंत यांनी पुरवठा विभागाकडे तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, संबंधित रेशन दुकानामध्ये मयत व्यक्तींच्या नावावर रेशनकार्ड तयार करून अथवा आधार क्रमांकात फेरफार करून धान्याची उचल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा गैरवापर झाल्याचा संशय निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित रेशन दुकानातून झालेल्या सर्व धान्यवाटपाच्या व्यवहारांचे सखोल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. रेशनकार्डधारकांची प्रत्यक्ष पडताळणी, आधार क्रमांकाची तपासणी तसेच संबंधित कालावधीतील धान्याच्या आवक-जावक नोंदी तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
परवाना निलंबित करण्याची मागणी
प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रेशन दुकानाचा परवाना निलंबित करावा, तसेच चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधितांवर नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील व्यवहारांच्या पारदर्शकतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुरवठा विभाग या प्रकरणाची काय भूमिका घेतो आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
