खामुंडी येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; ओतूर पोलिसांत गुन्हा दाखल
जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील घटना; BNS कलम 74, 75(2), 351(2) व POCSO कायद्यान्वये कारवाई

जुन्नर (खामुंडी) : 30/09/2026
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
जुन्नर : खामुंडी (ता. जुन्नर) येथे अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून ओतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बादशहाभाई पापाभाई मोमीन, रा. मराठी शाळेजवळ, खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 74, 75(2), 351(2) तसेच POCSO Act मधील कलम 8 व 12 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या FIR मधील माहितीनुसार, 14 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास संबंधित घटना घडल्याचा आरोप आहे. मुलीने दिलेल्या जबाबानुसार, आरोपीने तिचा हात धरल्याने ती घाबरली. त्यानंतर ती तेथून निघत असताना, ही बाब कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर भीतीमुळे मुलीने तत्काळ घरी याबाबत माहिती दिली नसल्याचे तिच्या जबाबात नमूद आहे. त्यानंतर तिने शाळेतील शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. शिक्षिकेने मुलीच्या आईला शाळेत बोलावून घेतल्यानंतर कुटुंबीयांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 28 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1.37 वाजता FIR नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर आमणे करीत आहेत.
पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. FIR मध्ये नमूद आरोप हे तपासाच्या अधीन असून, त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच निश्चित होईल.

