साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने, “स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या” वतीने चांडोली रुग्णालयात रुग्णांना फळेवाटप

राजगुरुनगर – ०५ ऑगस्ट २०२६
(मुख्य संपादक डॉ.निरंजन खंडागळे )
लोकशाहीर, साहित्यसम्राट आणि परिवर्तनवादी विचारवंत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले. समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा उपक्रम स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलासजी केदारी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. त्यांची “फकिरा” ही कादंबरी मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते. समता, सामाजिक न्याय आणि मानवी स्वाभिमानाचा संदेश देणारे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.
विकास शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी राजगुरूनगर येथील मार्केटयार्ड परिसरात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी टाइम्स ऑफ महाराष्ट्र चे संपादक डॉ.निरंजन खंडागळे ,विकास शिंदे, गणेश पाटोळे, सोमनाथ लोंढे, हेमंत पाटोळे, सोनम शिंदे, श्याम पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार कृतीत उतरविण्याचा प्रयत्न म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.




