झुरळ, अस्वच्छता अन् शिळे अन्न.
'एफडीए'ची पुण्यात व विभागात मोठी कारवाई; चार हॉटेल्सचे परवाने निलंबित
पुणे: १९/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे जिल्ह्यासह विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये अन्नपदार्थांमधील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणे व सातारा जिल्ह्यातील चार प्रमुख हॉटेल व रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच सुमारे एक लाख ७२ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
पावणेदोन लाखाचा साठा जप्त: पुणे विभागात एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा संशयास्पद व नियमबाह्य अन्नसाठा जप्त केला गेला आहे.
हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबन: प्रशासनाने दिलेल्या सुधारणा नोटीसचे पालन न केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुरूर (ता. वाई) येथील मे. मानस फॅमिली रेस्टॉरंटचा परवाना निलंबित केला आहे.
इतर ठिकाणची कारवाई. पाषाणमधील मे. आर. पी. हॉस्पिटॅलिटीज (रंगा पंजाब) आणि कर्वेनगरमधील मे. मनीषा डोसा सेंटर या दोन ठिकाणी स्वच्छता व अन्न हाताळणीच्या मानकांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील डिंबे खुर्द (ता. आंबेगाव) येथील मे. हॉटेल न्यू नित्यानंद अँड आइसक्रीमचा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.
अनियमितता आणि अस्वच्छता:बहुतांश ठिकाणी स्वयंपाकघरात अन्न व्यवस्थित तापमानावर न साठवणे, झुरळांचा वावर, कचरा, शिळे पदार्थ वापरणे आणि काही ठिकाणी वॉशरुम देखील स्वयंपाकघरात आढळल्याचे समोर आले आहे.
मिश्र व बेकायदेशीर उत्पादने: सांगलीतील हरिपूर येथे विनापरवाना सुरू असलेल्या मौर्या नमकीन व पेढीवर छापा टाकून ५३ हजार ६०० रुपयांचे २८५ किलो ‘चिली मिली’ नमकीन जप्त केले असून, व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोंढव्यातील पारस केमिकल्स इंडस्ट्रीजमधून ६१ हजार ८०० रुपयांचा १६४.८ किलो ग्लुकोजचा साठा जप्त केला असून, हा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय आहे.
नागरिकांच्या आरोग्याेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला आहे.