शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू
महाराष्ट्रातील खरीप पिकांना मोठा फटका; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
पुणे | २९ सप्टेंबर २०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर पीक नुकसानीचे पंचनामे मंगळवार, २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनामा ही आवश्यक प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विविध भागांमध्ये सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना पावसातील खंडाचा मोठा फटका बसला आहे. काही भागांमध्ये पिके पूर्णपणे वाळून गेल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. बियाणे, खते, मशागत आणि लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
आठ तालुक्यांमध्ये विशेष लक्ष
पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांमध्ये पंचनाम्याच्या प्रक्रियेला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हा कृषी विभागाने बाधित क्षेत्रांची माहिती संकलित करून पंचनाम्याचे नियोजन सुरू केले आहे. खेड,शिरूरसह काही भागांत पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांची अवस्था गंभीर झाल्याचे वृत्त आहे.
‘पिके उरलीच नाहीत, पंचनामा कशाचा?’
काही शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून नुकसानग्रस्त भागात तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाल्याने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मदत लांबू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. पशुधनासाठी चारा आणि पाण्याचीही तातडीची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चारा छावण्यांचेही नियोजन
पीक नुकसानीबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याने दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकार करत असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. त्यामुळे पंचनाम्याबरोबरच पशुधनासाठी आवश्यक उपाययोजनांकडेही लक्ष दिले जाणार आहे.
पंचनाम्यांनंतर मदतीचा मार्ग
पीक नुकसानीचे प्रत्यक्ष क्षेत्रनिहाय मूल्यांकन झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार मदत व नुकसानभरपाईच्या प्रक्रियेला पुढे जाता येणार आहे. त्यामुळे पंचनामे अचूक आणि वेळेत होणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
Times of Maharashtra | विशेष वृत्त
