जिल्हा बँक प्रतिनिधी निवडीसाठी आर्थिक तडजोडींची चर्चा खेड तालुक्यात राजकीय घडामोडींना आला वेग
खेड राजगुरुनगर : ०९/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकास सोसायट्यांमधून प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील सुमारे १०४ विकास सोसायट्यांमधून आपल्या विचारांचा प्रतिनिधी निवडण्यासाठी सोसायटी संचालकांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी निवडीची अंतिम मुदत २२ सप्टेंबर असल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील विविध विकास सोसायट्यांमधून प्रतिनिधी निवडण्यासाठी आर्थिक तडजोडी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खेड तालुक्यातील प्रतिनिधी पदासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार बाबाजी काळे, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल शेरमाळकर यांची नावे चर्चेत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बँकेसाठी प्रतिनिधी होण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींकडून सोसायटीच्या संचालकांची मनधरणी केली जात असून काही ठिकाणी संचालकांना भेटवस्तू तसेच आर्थिक स्वरूपाच्या आमिषांचा वापर होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
एका सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी संचालक मंडळातील सदस्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. काही ठिकाणी प्रतिनिधी निवडीसाठी अर्थिक व्यवहारांच्या चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मतदानाच्या दिवशी प्रतिनिधी निवडण्यासाठी मोठ्या रकमेची देवाणघेवाण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार, काही ठिकाणी हा आर्थिक व्यवहार एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत जाण्याची चर्चा आहे
दरम्यान, प्रतिनिधी निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला थारा मिळू नये, अशी अपेक्षा सभासद व शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
— Times of Maharashtra Digital News —