गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक; मंडळे, नागरिक आणि प्रशासनाने समन्वय ठेवण्याचे आवाहन,लेझर, डीजेचा त्रास झाल्यास तत्काळ कारवाईचे आदेश.
राजगुरुनगर, दि. ०९/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
गणेशोत्सव २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच शांततेत आणि ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात लेझर प्रकाशयंत्रणा किंवा मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकामुळे नागरिकांना त्रास झाल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिला.
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात प्रशासनाच्या वतीने बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस, महसूल, नगर परिषद, महावितरण तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. विसर्जन मिरवणुकीमध्ये समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, तसेच ध्वनिक्षेपकासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे खेडचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
नगर परिषदेकडून गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यात आली असून मंडळांनी रस्त्यावर मंडप उभारताना नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. देखावे कायदेशीर व सांस्कृतिक स्वरूपाचे असावेत. निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून नागरिकांनी त्याचा वापर करावा. तसेच मूर्तीदानासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीवेळी वीज तारांबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी. उत्सव काळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असल्याचे महावितरणचे उपअभियंता उत्तम मंचरे यांनी सांगितले.
शिरोली परिसरात गणेशमूर्ती तयार करून त्या खरपुडी रस्त्याने बाहेर नेताना वाहतूक कोंडी होते. त्यामुळे गणेशोत्सव काळात योग्य वाहतूक नियोजन करण्याची मागणीही पोलिस पाटील निर्मला ताई देखणे यांनी केली आहे.
उत्कृष्ट गणेश मंडळांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.
बैठकीस पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, महावितरणचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, महिला दक्षता समितीच्या प्रतिनिधींसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.