खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अँड. देवेंद्र बुद्दे पाटील यांची सातव्यांदा निवड
खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राजगुरुनगर :१२/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
खेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी अध्यक्षपदी अँड. देवेंद्र बुद्दे पाटील यांची सातव्यांदा एकमताने निवड करण्यात आली.
गेल्या तब्बल २५ वर्षांपासून संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या अँड. बुद्दे पाटील यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
अँड. देवेंद्र बुद्दे पाटील हे २००१ पासून खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
या निवडीनंतर आयोजित सभेला जिल्हा परिषद सदस्य विजयासिंह शिंदे, अनिल राक्षे, एस. पी. देशमुख, दशरथ ढोबळे यांच्यासह संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव प्रकाश पाचारणे यांनी मांडला, तर माणिक भांबुरे यांनी त्याला अनुमोदन दिले. तसेच आगामी कार्यकारिणी निवडीचे अधिकारही सभेने अध्यक्ष अँड. देवेंद्र बुद्दे पाटील यांना दिले.
दरम्यान, आमदार बाबाजी काळे यांनी अँड. बुद्दे पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या खेड तालुक्याच्या शैक्षणिक विकासातील योगदानाचे कौतुक केले.

यावेळी नवीन महाविद्यालयासाठी सीएसआर फंडाच्या माध्यमातून इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. तसेच खेड तालुक्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर, सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अँड. देवेंद्र बुद्दे पाटील यांनी आभार व्यक्त केले. आगामी काळात नर्सिंग कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
सभेचे अहवालवाचन उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले, तर संचालक हिरामण सातकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
एकंदरीत, अँड. देवेंद्र बुद्दे पाटील यांची सातव्यांदा झालेली निवड ही खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन नेतृत्वावर सभासदांनी व्यक्त केलेल्या विश्वासाची पावती मानली जात आहे.
