पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस शिपायावर धारदार शस्त्राने हल्ला!
तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देणे पडले महागात; गळ्यावर गंभीर दुखापत, चौघे ताब्यात
पुणे : २१/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
पुणे (प्रतिनिधी) : पुणे रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) पोलीस शिपायावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (८ सप्टेंबर २०२६) रात्री घडली. अक्षय महादेव बांबल असे जखमी पोलीस शिपायाचे नाव असून, हल्ल्यात त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मालधक्का चौक परिसरात काही तरुण एकत्र होते. त्यांच्यापैकी काही जण धूम्रपान व मद्यपान करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, संबंधित तरुणांना अशा व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यासाठी बांबल तेथे गेले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका तरुणाच्या आईने आपल्या मुलांना समज देण्याची विनंती बांबल यांच्याकडे केली होती. त्यानंतर बांबल यांनी संबंधित तरुणांशी संवाद साधला. मात्र, या गोष्टीचा राग आल्याने वाद वाढला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे.
गळ्यावर गंभीर वार; सहा टाके
हल्ल्यात बांबल यांच्या गळ्याला खोल जखम झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या जखमेवर सहा टाके घातल्याचे पोलिसांनी सांगितले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली.
चौघे ताब्यात; बंडगार्डन पोलिसांचा तपास
घटनेनंतर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीनांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यात प्रत्येकाची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, सुरुवातीच्या माहितीत पोलीस शिपायाकडील सोन्याची साखळी आणि मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या वस्तू प्रत्यक्षात चोरीला गेल्या का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यावरच झालेल्या या हल्ल्यामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

