Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

जामखेडच्या कला केंद्रातील वादाचा थरारक शेवट

गर्भवती महिलेची हत्या करून धुळ्यात पेट्रोल टाकून जाळले

जामखेड/धुळे : २८ सप्टेंबर २०२६

मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी

जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रातील अंतर्गत वादातून एका ३१ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून तिचा मृतदेह धुळे जिल्ह्यातील गरताडबारी परिसरातील निर्जन भागात पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा मोहाडी नगर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावल्याचे वृत्त असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

मृत महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर (वय ३१, रा. रायगड) अशी पटली आहे. २२ सप्टेंबर रोजी धुळे-सोलापूर महामार्गालगत गरताडबारी परिसरातील एका निर्जन भागात महिलेचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाजवळ ज्वलनशील पदार्थाची बाटलीही आढळली होती. शवविच्छेदन अहवालात महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यासह पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.

११ तासांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला धागा

महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. तपास पथकाने महामार्गावरील तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयास्पद हुंडाई मोबिलिओ कार आढळली. वाहनाच्या तांत्रिक विश्लेषणातून त्याचा संबंध जामखेडशी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तपास पथकाने जामखेडमधील सप्तसूर कला केंद्र गाठले.

चौघांना अटक; दोघे संशयित फरार

या प्रकरणात सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन, आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख, स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे आणि लक्ष्मी बालाजी पवार यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फारुख शेख आणि रोहिणी जाधव या दोघांचा शोध सुरू असल्याचे वृत्त आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कला केंद्रातील वादातून पिंकी काटकर यांच्यावर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील परिसरात मारहाण करण्यात आली. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना वाहनातून अन्यत्र नेण्यात आले. पुढे धुळे जिल्ह्यातील गरताडबारी परिसरात त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावण्यात आल्याचा तपासातील दावा आहे.

या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा क्रमांक ३२२/२०२६ दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. हत्येमागील नेमके कारण, कला केंद्रातील वादाचे स्वरूप आणि सर्व संशयितांची भूमिका याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!