दशक्रिया आंदोलनाचा धसका! रविवारीच प्रशासन खरपुडी बंधाऱ्यावर; मंगळवारपासून काम सुरू करण्याचा शब्द

खरपुडी बु./खु. (खेड) : ०४/१०/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
खरपुडी येथील बंधाऱ्याच्या दुरावस्थेविरोधात आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मंगळवारी जलसंपदा विभागाची ‘दशक्रिया’ करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाचा परिणाम म्हणून रविवारी सुट्टीच्या दिवशीच प्रशासनाने खरपुडी बंधाऱ्यावर धाव घेतली.
दरम्यान, मोहन तात्याबा जाधवर कार्यकारी अभियंता ( चासकमान पाटबंधारे विभाग पुणे ) यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधून बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.

उपविभागीय अधिकारी चासकमान पाटबंधारे उपविभाग क्रमांक ५, खेड संतोष शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून बंधाऱ्याची पाहणी केली. बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत आवश्यक कार्यवाही करून येत्या मंगळवारपासून काम सुरू करण्याचा शब्द प्रशासनाने दिला.या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषद सदस्य व गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी मध्यस्थी करत प्रशासनाशी समन्वय साधला. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे यांनीही प्रशासनाला आवश्यक निर्देश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, खरपुडी ग्रामविकास अधिकारी श्रीमती अस्मिता गायकवाड , सोमनाथ टोपे, बाजार समितीचे माजी सभापती दशरथ गाडे, निवृत्ती गाडे, संदीप गाडे, केशव आरगडे, रुपेश आरगडे, प्रसाद भोगाडे, धनंजय कड, नंदकुमार टोपे, चैतन्य गायकवाड, नवनाथ बरबटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

