शिरूरमध्ये ६१ किलो गांजा जप्त; ४०.६६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
स्कॉर्पिओ वाहनासह एक आरोपी ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शिरूर (पुणे) : २३/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
शिरूर परिसरात अमली पदार्थांची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल ६१ किलो वजनाचा गांजा तसेच गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ कार असा एकूण ४० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार शिरूर परिसरात गस्त सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, कवठे येमाई परिसरात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२, रा. इचकवाडी, कवठे येमाई, ता. शिरूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ६१ किलो गांजा व एमएच १२ एचडी ०९३८ क्रमांकाची स्कॉर्पिओ कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८४४/२०२६ नुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(क)(ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
अमली पदार्थांबाबत माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे पुणे ग्रामीण पोलिसांनी आवाहन केले आहे.


