Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची पाहणी करण्यासाठी शरद पवार २८ सप्टेंबरपासून दौऱ्यावर

पुणे : २२ सप्टेंबर २०२६

मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी

पुणे : राज्यातील पावसाअभावी निर्माण झालेल्या कृषी संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार २८ सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते पिकांच्या नुकसानीची पाहणी करून बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत.

राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले होते. पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असतानाच कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने कृषी, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.

पवार यांनी राज्यातील पावसाअभावी प्रभावित तालुके तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतमजूर कुटुंबांना २५ हजार रुपयांचे विशेष सहाय्य, कर्जमाफी, नवीन पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ आणि रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही दुष्काळ जाहीर करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले असून कृषी व महसूल विभागाकडून माहिती संकलित करून पुढील निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभावित पाच ते सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा २८ सप्टेंबरपासून सुरू होणारा दौरा महत्त्वाचा ठरणार असून, या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीची परिस्थिती ते जाणून घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!