१८ पोलिस कर्मचाऱ्यांवर सीआयडीचे दोन गुन्हे दाखल
अल्पवयीन मुले आणि प्रौढांना मारहाण व धिंड प्रकरण

पुणे : २४/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक: श्री कैलास केदारी
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांतर्गत अल्पवयीन मुले आणि प्रौढांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, कस्टोडियल मारहाण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांची धिंड काढून अपमानित केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या (MSHRC) आदेशानुसार सीआयडीने (CID) कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी १८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
मानवी हक्क आयोगाने स्वतःहून (Suo Motu) या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशीत पोलिसांकडून मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. यानंतर आयोगाच्या ९ सप्टेंबरच्या आदेशानुसार आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या निर्देशानंतर सीआयडीचे उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह एकूण १८ पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर शिकंजा कसण्यात आला आहे.
दोन गुन्ह्यांमधील मुख्य बाबी:
१. पहिला गुन्हा (प्रौढांची मारहाण व सार्वजनिक धिंड):
एका गुन्ह्यात आत्मसमर्पण केलेल्या ४ प्रौढ व्यक्तींना ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ताब्यात घेण्यात आले होते, मात्र त्यांची अधिकृत नोंद रात्री १०:३० वाजता दाखवण्यात आली. पोलीस कोठडीत त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच ७ जुलै रोजी त्यांना एका एसआरए (SRA) कॉलनीत नेऊन गुडघ्यावर बसवून मारहाण करणे आणि सार्वजनिक माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी १३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. दुसरा गुन्हा (अल्पवयीन मुलांना मारहाण आणि वाहनाच्या बोनेटवर धिंड):
खून प्रकरणातील अल्पवयीन संशयितांना बेकायदेशीरपणे विहित मुदतीहून अधिक काळ पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याचा आरोप आहे. यातील ३ मुलांना दोरीने पोलिसांच्या गाडीच्या बोनेटला बांधून आंबेगाव पठार चौकीपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. तसेच त्यांना काठ्या व बेल्टने बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी ११ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलांपैकी काही जण अनुसूचित जातीचे असल्याने त्यात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये (SC/ST Act) कलमे लावण्यात आली आहेत.
या संपूर्ण गंभीर प्रकारामुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडीकडून केला जात आहे.
