वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह ११ पोलिसांवर ‘ॲट्रॉसिटी’सह गुन्हे दाखल
आंबेगाव पठार धनकवडी पुणे , पोलीस चौकीत ८ अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण व बोनेटवर बांधून धिंड प्रकरण;

धनकवडी पुणे :२५/०९/२०२६
मुख्य संपादक डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक श्री कैलास केदारी
पुण्यातील धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार पोलीस चौकीत एका खूनाच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या तब्बल ८ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, पट्ट्या व लाठ्यांनी बेदम मारहाण करणे तसेच पोलीस वाहनाच्या बोनेटवर बांधून त्यांची धिंड काढल्याप्रकरणी एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या (MSHRC) आदेशानुसार आणि सीआयडीच्या (CID) अहवालाच्या आधारे एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह ११ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
अवैध कस्टडी आणि मारहाण: परिसरातील एका खूनाच्या प्रकरणाच्या तपासाच्या नावाखाली पोलिसांनी २० आणि २१ जुलै रोजी एकूण ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. या मुलांना कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) विहित मुदतीत न ठेवता आंबेगाव पठार पोलीस चौकीत बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले.
अमानुष अत्याचार: या मुलांना चौकीत बांबूच्या लाठ्यांनी आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यापूर्वी पोलिसांच्या मारहाणीबाबत डॉक्टरांना काहीही न सांगण्याची धमकीही त्यांना देण्यात आली होती.
पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बांधून धिंड
या प्रकरणातील अत्यंत लाजीरवाणी बाब म्हणजे, यातील काही अल्पवयीन मुलांना दोराने पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर बांधून आंबेगाव पठार चौकी ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यापर्यंत सार्वजनिक रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली. या अमानुष व मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
ॲट्रॉसिटी’सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल
पिडीत मुलांपैकी काही मुले ही अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यामुळे या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS), बाल न्याय कायदा (JJ Act) यांसह ॲट्रॉसिटी कायद्याच्या (Scheduled Castes and Scheduled Tribes – Prevention of Atrocities Act) कठोर कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल झालेल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची नावे:
सीआयडीचे उपअधीक्षक संकेत सतिश गोसावी यांच्या फिर्यादीवरून नोंदवण्यात आलेल्या या गुन्ह्यात खालील अधिकारी व कर्मचारी आरोपी खालीप्रमाणे आहेत:
1. मानसिंग पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
2. गणेश मोहिते (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
3. स्नेहल थोरात (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
4. नीलेश मोकाशी (पोलिस निरीक्षक/अधिकारी)
5. सुनील हनवटे (पोलिस हवालदार) यांच्यासह इतर ५ ते ६ अंमलदार व कर्मचारी.
मानवी हक्क आयोगाच्या कडक कारवाईनंतर पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीमार्फत केला जात आहे.

