वाकडमध्ये छेडछाडीच्या वादातून तरुणाचा खून; तिघांना अटक
कावेरीनगर परिसरातील घटनेने खळबळ; वाकड पोलिसांचा तपास सुरू

वाकड (पुणे) : २२ सप्टेंबर २०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
वाकड : बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ३५ वर्षीय तरुणाचा मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना वाकड परिसरातील कावेरीनगर येथे घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी रात्री कावेरीनगर भाजी मंडईसमोरील कचरा टाकण्याच्या ठिकाणाजवळील मोकळ्या जागेत मारोती बनसोडे (वय ३५, मूळ रा. बीड; सध्या रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर हल्ला करण्यात आला.

बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरून आरोपींनी मारोती बनसोडे यांना अडवून त्यांच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर तसेच शरीराच्या अन्य भागांवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या बनसोडे यांचा या घटनेत मृत्यू झाला.
या प्रकरणी अमित दशरथ साळुंखे (वय २६), किशोर वाघमारे (वय ३९) आणि भारत पवार (वय २३) या तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सुग्रीव गायकवाड यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, हत्येमागील परिस्थिती आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास करण्यात येत आहे.
