दौंड पंचायत समिती येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा
"पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनासाठी माहितीचा अधिकार सक्षम लोकशाहीचा आधार" - गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांचे वक्तव्य, " जनमाहिती अधिकारी यांनी कायद्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक " - राहुलकुमार अवचट यांचा सल्ला

दौंड : २८/०९/२०२६
मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त दौंड पंचायत समिती कार्यालय येथे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

सर्व शासकीय कार्यालयाने माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ च्या कलम ४ ची अंमलबजावणी केल्यास कार्यालयात येणारी माहिती अधिकार अर्जाची संख्या कमी होऊ शकते असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी व्यक्त केला.
दौंड पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माहिती अधिकार दिन चर्चासत्राच्या निमित्ताने ते बोलत होते
माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून दौंड पंचायत समितीच्या वतीने आज दि. २८ सप्टेंबर रोजी पंचायत समितीच्या स्वर्गीय बाबुराव कुल सभागृहात दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली, गटविकास विकास अधिकारी अरुण मरभळ, दौंड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते जयदीप बगाडे , अमर जोगदंड व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.
पंचायत समिती सामाजिक न्याय विभागाचे नाना मारकड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करताना माहिती अधिकार कायदा उगम व पार्श्वभूमी बाबत माहिती दिली. यावेळी जयदीप बगाडे यांनी माहिती अधिकार कायद्यायांसह विविध शासकीय निर्णयांचे माहिती देत प्रथमच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत माहिती अधिकार दिन साजरा होत असल्याचे समाधान व्यक्त करत शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिक व पत्रकारांना देखील कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी शासकीय कामात पारदर्शकता व गती निर्माण व्हावी, यासाठी माहिती अधिकार कायदा अस्तित्वात असून या कायद्याची सर्वसामान्य नागरिकांना माहिती व जनजागृती व्हावी यासाठी शासनाच्या वतीने २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना सरकार दरबारी सुरु असलेल्या विविध बाबींची माहिती करून घेण्याचा महत्वाचा अधिकार या कायद्याने मिळाला असून नागरिकांना माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २१ वर्षापासून कायदा अस्तित्वात आला परंतु आजही अनेक शासकीय कार्यालय माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ चे कलम ४ (१) (ख) अंमलबजावणी करत नाही सर्व प्रशासनाने ही अंमलबजावणी केल्यास माहिती अधिकारात अर्ज येण्याचे प्रमाण ८० % कमी होऊ शकेल तसेच जन माहिती अधिकारी यांनी अर्ज आल्यानंतर तीस दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर माहिती बाबत पत्रव्यवहार करावा व जास्तीत जास्त जन माहिती अधिकारी यांनी कायद्याची प्रशिक्षण घ्यावे असे आवाहन केले.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण मरभळ यांनी माहिती अधिकार कायदा हा पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासनासाठी महत्त्वाचा असून लोकशाहीचा भक्कम आधार आहे , जनमाहिती अधिकारी यांनी आपल्याकडे असलेली माहिती ही प्रसिद्ध केल्यास येणाऱ्या अर्जाची संख्या नक्कीच कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सभापती सुखदेव चोरमले यांनी माहिती अधिकार कायदा लोकशाही साठी खूप चांगला कायदा असून शासकीय कामांना गती देण्यासाठी या उपयुक्त कायदा आहे परंतु काही जण या कायद्याचा गैरवापर करतात का ? याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशी भावना व्यक्त करत सर्वांना माहिती अधिकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर
सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय भालेराव यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सामान्य प्रशासन,ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग,कृषी, पंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण,जिल्हा ग्रामीण विकास , बांधकाम आदि विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक अधिकारी व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

